
नागपूर : शहरातील एका प्रसिद्ध स्टील कंपनीवर आयकर विभागाने अचानक धाड टाकल्याने औद्योगिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी सुरू केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित स्टील कंपनीने अलीकडेच चंद्रपूर येथील दोन प्लांटची विक्री केली असून नागपूरमधील एक प्लांटही विकल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता किंवा कर चुकवेगिरीचा संशय असल्याने आयकर विभाग ही कारवाई करत असल्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांकडून कंपनीचे आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, बँकिंग नोंदी आणि प्लांट विक्रीसंबंधीचे सर्व व्यवहार तपासले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणाबाबत कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









