नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात भाष्य करत याची केंद्र सरकारने जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आम्ही तिकडे जाऊन काही करु शकू अशातला भाग नाही. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील तर सध्या आपलं अधिवेशन सुरु आहे.
कालच एक सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? असे असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता, असे ठाकरे म्हणाले.
भारतात अद्यापही मणिपूरचा मुद्दा पेटलेला आहे. काश्मीरमध्येही हिंदूंच्या हत्या होत आहेत. आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केले पाहिजे.
ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. जर शेख हसीनांना तुम्ही आश्रय देत असाल तर बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच असल्याचे ठाकरे म्हणाले.