नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे यांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे एनडीएत (महायुतीत) सहभागी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याकडे लोकसभेच्या दोन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
शहा यांच्यासमोर राज यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर शाह यांनी एकच जागा शक्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचे म्हटले. यानंतर राज यांनी लोकसभेनंतर पुढे काय, असे विचारले. यावर सध्या कोणताही शब्द देणे शक्य नसल्याचेही शाह यांनी राज यांना म्हटल्याची माहिती आहे.