नागपूर : भंडाऱ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पटोले यांच्या गाडीच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. पटोले या अपघातातून थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का?अशी संशयही अतुल लोंढेंनी व्यक्त केला.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत याप्रकरणावर आपले मत मांडले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे.
ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप असल्याचे ते म्हणाले.