Published On : Thu, Jun 21st, 2018

योगसाधनेचे महत्व सर्वांना कळणे आवश्यक

नागपूर: नागपूर महानगर पालिकेने आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित केलेल्‍या मुख्य कार्यक्रमात नागपुरातील विविध योग संस्थांचे योग्य सहकार्य मिळत असल्याने नागपूरातील प्रत्येक घरांत,युवांमध्ये योगसाधनेचे महत्व कळायला लागले आहे. योगापासून मिळणा-या शांती व उर्जेला ते समर्पित होत आहेत, अ‍से प्रतिपादन नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक यशवंत स्टेडीयम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलतांना केले.

या कार्यक्रमास नागपूरचे उपमहापौर दीपराज पार्डीकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महानगरपालिका आयुक्‍त वीरेंद्र सिंह, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, जर्नादन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळाचे कार्यवाहक आणि ज्‍येष्‍ठ योगगुरू रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना जगासमोर मांडली. या प्रस्तावाला अनेक देशांनी पाठींबा दिला व 21 जून 2015 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेनेही 21 जून 2015 रोजी पहिल्या योग दिवसाचे भव्य आयोजन केले होते. सलग चौथ्या वर्षी हा दिवस साजरा होत आहे व या आयोजनासाठी शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ, योग केंद्र यांचे सहकार्य लाभत आहे, असे नागपूरचे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी याप्रसंगी सांगितले.

जनार्दन स्‍वामी योगाभ्‍यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासनांच्या प्रात्यक्षिकाच्या मुख्य कार्यक्रमात उपस्थित योग साधकांनी एकाच वेळी योगाची प्रात्यक्षिके यावेळी केली. विविध योग संस्थांच्या वतीने सुद्‌धा योगासन, ध्यान यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आलीत.

या कार्यक्रमास नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, विविध योग संस्‍थांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, शालेय विद्यार्थी तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.