Published On : Tue, Jul 28th, 2020

लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे आता घरीच विलगीकरण

Advertisement

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी : रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण पात्र नाही

नागपूर : कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहूनच घरी विलगीकरण करता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत नागपूर महानगरपालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार लक्षण नसलेले/सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल येथे दाखल करावयाचे आहे. मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून गृह विलगीकरण करता येईल.

काय आहे मार्गदर्शक सूचना?
शासनाने आणि स्थानिक स्तरावर मनपाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे. संबंधित रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. एचआयव्हीग्रस्त, कर्करोगाचा उपचार घेणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आदी रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रुग्ण तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत/फुप्फुस/मूत्रपिंडाचे रुग्ण आदी रुग्णानची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांनी केल्यानंतरच सदर रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय किंवा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी अथवा मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य राहील. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी लागेल. मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करावे व ते सतत ॲक्टिव्ह असेल याविषयी दक्ष राहावे. रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी मनपाचे सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण पथक अर्थात रॅपिड रिस्पॉन्स टीमला माहिती देणे अनिवार्य राहील. रुग्णांने स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरुन द्यावे लागेल. सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदरील व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल. उपचार करणाऱ्या डॉक्टराननी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी. निकट सहवासीयांना घरी करावयाच्या अलगीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काळजीवाहू व्यक्ती व रुग्णांसाठीच्या सूचनाही परिशिष्ट क्र. २ मध्ये दिलेल्या आहेत.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा निर्माण हाणे, ऑक्सीजन सॅच्युरेशनमध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

आरोग्य यंत्रणेची जबाबदारी
गृह विलगीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणेची जबाबदारीही स्पष्टपणे नमूद केलेली आहे. मनपाच्या आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्व्हेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीद्वारे करेल. कॉलसेंटरद्वारे त्याचा पाठपुरावा करेल. रुग्णांच्या प्रकृतीची नोंद कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, कॉलसेंटरमधील कर्मचारी ठेवतील. आरोग्य कर्मचारी रुग्णांना अथवा नातेवाईकांना प्रकृतीच्या स्वपरिक्षणाबाबत मार्गदर्शन करतील व सूचना देतील. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची माहिती कोव्हिड-१९ पोर्टल व फॅसिलीट ॲप यावर टाकण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी याचे संनियंत्रण करतील. जर रुग्णाने नियमाचा भंग केला किंवा रुग्णाला अधिक उपचाराची गरज भासली तर सदर रुग्णाला संदर्भित करण्याची यंत्रणा तयार असेल. कुटुंबातील सर्व सदस्य व निकट संपर्कातील व्यक्ती या सर्वांची तपासणी व संनियंत्रण मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. डिस्चार्जबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांचेही काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मनपा आरोग्य यंत्रणेची राहील.

गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?
गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरिक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोव्हिड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.