Published On : Thu, Aug 27th, 2020

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

Advertisement

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज ही सरकारची दडपशाही

नागपूर : स्वतःच्या मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून बदडून काढणे ही महाविकास आघाडी सरकारची दडपशाही आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करवून घेणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.

धुळे येथे विद्यार्थ्यांनी आज बुधवारी (ता.२६) आंदोलन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या चुकीच्या धोरणामुळे ५० टक्के विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा करणाऱ्या उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा आणि येत्या शैक्षणिक सत्राची ३० टक्के शुल्क माफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ना.सत्तार यांनी भेटीकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी रोखून निदर्शने दिली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली.

विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना अमानुषपणे मारहाण करणे या सुज्ञ महाविकास आघाडी सरकारला शोभणीय नाही, असा टोलाही भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी लावला.