
नागपूर : महिलांची सुरक्षा, महिलांविरोधातील वाढते गुन्हे, छेडछाड, रात्रीच्या वेळी महिलांचा सुरक्षित वावर आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागपूर टुडेने डीसीपी रश्मिता राव यांच्याशी विशेष संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी महिला सुरक्षेबाबत नागपूर पोलिसांची भूमिका, विशेष महिला पथकांची कार्यपद्धती आणि भविष्यातील नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.
महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे वावरता यावे, रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतताना कोणतीही भीती वाटू नये आणि अडचणीच्या प्रसंगी तातडीने पोलीस मदत मिळावी, यासाठी नागपूर शहर पोलीस सक्रियपणे काम करत असल्याचे रश्मिता राव यांनी सांगितले. महिलांविरोधातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून काही प्रकरणांमध्ये अवघ्या ६ ते १३ तासांत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
महिला सुरक्षेसाठी २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘दुर्गा मार्शल’ उपक्रमाविषयी बोलताना त्यांनी या पथकात १४ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले. शहरातील विविध भागांत गस्त घालून छेडछाड करणारे, महिलांचा पाठलाग करणारे आणि रोडरोमिओंवर लक्ष ठेवण्याचे काम या पथकाकडून केले जाते. यासोबतच डायल ११२ वर तक्रार मिळाल्यानंतर साधारणतः पाच ते सहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकारातून शहरात १२ महिला नेतृत्वाखालील निर्भया पथके सुरू करण्याचे नियोजन आहे. या पथकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढविणे, नियमित गस्त घालणे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. महिलांच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि त्यांना पोलीस ठाण्यात विश्वासाचे वातावरण देणे, या मुद्द्यांवरही रश्मिता राव यांनी आपली भूमिका मांडली.
महिलांचे हक्क, सुरक्षिततेची भावना आणि समाजातील पितृसत्ताक मानसिकता अशा व्यापक विषयांवरही या मुलाखतीत चर्चा झाली. महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेची जबाबदारी, गुन्हेगारी रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि नागपूर पोलिसांचे आगामी नियोजन जाणून घेण्यासाठी नागपूर टुडेने घेतलेली ही विशेष मुलाखत महत्त्वपूर्ण ठरली.



