Published On : Wed, Jan 3rd, 2018

सिंचन आढावा बैठक: कोच्छी व खिंडसी प्रकल्प जून 19 पर्यंत पूर्ण करा – पालकमंत्र्यांचे निर्देश

irrigation meeting
नागपूर: कमीत कमी निधी खर्च करून अधिकाधिक सिंचन क्षमता वाढेल अशा लहान प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा. तसेच कोच्छी व खिंडसी फिडर प्रकल्प येत्या जून 19 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र वाढविणे आणि अधिकार्‍यांच्या अडचणी समजवून घेण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी निर्देश दिलेत. तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचे या बैठकीतून दिसले. तसेच पाणीपट्टीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधीचे नियोजन करून त्वरित शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

तूर्तास कामे सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामाची स्थिती काय आहे, किती निधीची गरज आहे, तसेच 2018-19 मध्ये घेण्यात येणार्‍या कामाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा परिषद सिंचन विभागानेही आपले लहान लहान प्रकल्प दुरुस्ती करून किवा अपूर्ण असतील तर ते पूर्ण करून सिंचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. पेंच प्रकल्पाची 15 पैकी 14 कामे सुरु असल्याची माहिती अधिकार्‍यांनी या बैठकीत दिली. पेंचची दुरुस्तीची कामे, अस्तरीकरणाची कामे, मूळ प्रकल्पाची कामे समजून जून 19 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. कन्हानच्या पाण्याचा वापर वाढवून पेंचचे पाणी शिल्लक राहील अशा पध्दतीचे नियोजन करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.

उपसा सिंचन योजनांना 24 वीजपुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले. सत्रापूर सिंचन योजनेला 24 तास वीज पुरवठा मिळत आहे. अंभोरा 1 व अंभोरा 2 ला 24 तास वीजपुरवठा देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.