Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 27th, 2018

  दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण; 100 कोटींच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता


  मुंबई: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार केला असून मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नांमूळे या प्रस्तावाला आज शिखर समितीने मान्यता दिली.

  मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज शिखर समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री व नागपूर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आ. नाना श्यामकुळे, दीक्षा भूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, मुख्य सचिव सुमित मलिक, नगर विकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नितीन करीर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसकर आदी उपस्थित होते.

  आजच्या बैठकीत दीक्षाभूमीच्या सौंदर्योकरण व नागरी सुविधा उपलब्धतेबाबत सादरीकरण करण्यात आले. आधी जिल्हा समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर मुख्यसचिव स्तरावर व आज शिखर समितीची बैठक घेण्यात आली. सध्या दीक्षाभूमीकडे उपलब्ध असलेल्या जागेचाच विकास व सौंदर्योकरण करण्यात येणार आहे.

  सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाबाबत भाग 1 चा हा प्रस्ताव असून टप्प्याटप्प्याने अन्य भागांचे काम करण्यात येणार आहे. विकास आराखड्याची जबाबदारी नासुप्रकडे आहे.असून मे. डिझाईन असोसिएट्स इन्कॉर्पोरेशन नोएडा यांची या प्रकल्पासाठी सल्लागार वास्तुविशारद म्हणून 2016 मध्ये नियुक्ती झाली आहे. या कंपनीने डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या 22.4 एकर जागेवरील प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आली.

  या कामांमध्ये व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पथपथ, भाविकांसाठी सुविधा क्षेत्र, प्रसाधने, पिण्याच्या पाण्याची सविधा,विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तुपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, ऑडिओ सिस्टिम, किरकोळ कामे आदींचा समावेश करण्यात आला आहे.


  ड्रॅगन पॅलेसला निवासस्थाने व सुविधांसाठी 25 कोटी
  नागपूर शहराजवळ व कामठी शहरात असलेल्या पवित्र ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे विजया दशमीला व दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशातून व परदेशातून हजारो उपासक येथे विपश्यनासाठी येतात. या भाविकांचा येथे मुक्काम असतो. या भाविकांसाठी निवास व अन्य सुविधांची व्यवस्था करण्यासाठी 25 कोटींच्या प्रस्तावाला आज शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली.

  ड्रॅगन पॅलेसचा विकास कसा करण्यात येईल याचेही सादरीकरण आज करण्यात आले. अंतरराष्ट्रीय पर्यटक येथे दरवर्षी मोठया प्रमाणात भेट देत असतात. निवासस्थानांची व्यवस्था नसल्याने भाविकांची अडचण होते.ड्रॅगन पॅलेसची मुख्य इमारत सोडून शेजारच्या जागेवर निवासस्थानांसाठी सहा मजली इमारत, भोजनगृह, सभागृह, विविध उपयोगासाठी कक्ष, कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी खोल्या, स्नानगृह व शौचालय, पार्किंग, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्व सुविधंसाठी 25 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आल असून या प्रस्तावाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145