Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 4th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट थिम पार्क प्रकल्पास मुख्यमंत्र्यांची मान्यता

  लवकरच निधी उपलब्ध होणार

  मुंबई: कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुध्दिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला आज शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. 214 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल.

  सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री. सुलेखाताई कुंभारे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  या प्रकल्पाचे सादरीकरण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून एनएमआरडीएला नियुक्त करण्यात आले आहे. प्रन्यासने सादर केलेल्या 214 कोटीच्या अंदाजपत्रकास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. ड्रॅगन पॅलेसला अ वर्ग दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती. ड्रॅगन पॅलेस या स्थळाला देशी-विदेशी पर्यटक मोठया प्रमाणात भेट देत असतात. या स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. बुध्दिस्ट थिम पार्क सोबत कन्व्हेन्शन सेंटरही येथे उभारण्यात येणार आहे.

  या थिम पार्क अंतर्गत विपश्यना केंद्र, मेडिटेशन, सेंटरचे उदघाटन यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते झाले आहे. गौतम बुध्दांच्या जन्म भारतात झाला तसेच गौतम बुध्दांचे तत्वज्ञान जपान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांनी स्वीकारले आहे. या थिम पार्कमुळे बुध्दांचे तत्वज्ञान स्वीकारलेले देश आणि भारतीय संस्कृतीचे आदानप्रदान होईल. यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होईल.

  बुध्दिस्ट थिम पार्कच्या प्रस्तावात , संगीत कारंजे, पार्क, आर्ट क्राप्ट सेंटर, निवास व्यवस्था, पार्किंग, शौचालये, व्हीआयपी निवास व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, विविध देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, शॉपिंग कॉम्लेक्स, गौतम बुध्दांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन बुध्दिस्ट थिमवर आधारित बगिचा, बुध्दिस्ट कोर्ट आदींचा समावेश असलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145