Published On : Sat, Jun 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात उभारण्यात येणार आंतरराष्ट्रीय एग्री बिझनेस स्कूल; स्पेनच्या तज्ज्ञ प्रतिनिधींची सहमती

विदर्भातील शेतकऱ्यांना जागतिक संधी
Advertisement

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे आणि तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानात प्रशिक्षित करून सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवून नागपूरमध्ये “अ‍ॅग्रोव्हिजन ग्लोबल एग्री बिझनेस स्कूल” सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला असून, त्यांनी यासंबंधी माहिती दिली.

गडकरी म्हणाले, “शेती ही फायदेशीर ठरू शकते, यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. एग्री बिझनेस स्कूल हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून विदर्भातील तरुणांना जागतिक कृषी नवोन्मेषांची ओळख करून दिली जाईल, तसेच स्टार्टअप आणि निर्यातीसाठी मार्गदर्शन मिळेल.”

Gold Rate
30 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg ₹ 1,14,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमाच्या तयारीसाठी स्पेनमधून एक उच्चस्तरीय तज्ज्ञ प्रतिनिधीमंडळ नुकतेच विदर्भ दौऱ्यावर आले होते. त्यांनी नागपूर व आसपासच्या संत्रा उत्पादक भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी, गरजा आणि संधी यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर, नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे एग्री बिझनेस स्कूल सुरू करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

स्पेनमधील तज्ज्ञ डेव्हिस मोरेनो, फ्रान्सिस्को जेव्हियर आणि जॉन अँटोनिओ यांनी दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. एग्रोव्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून भारत आणि स्पेन दरम्यान कृषी तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी खास उपक्रम राबवण्यात येतील, अशीही घोषणा या वेळी करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी श्रीमती कंचन गडकरी, एग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, संरक्षक डॉ. सी. डी. माई, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रशांत कडू आणि अनेक संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

विदर्भातील कृषी क्षेत्रासाठी ही योजना केवळ शिक्षण आणि मार्गदर्शनपुरती मर्यादित न राहता, रोजगार, नवउद्योग आणि जागतिक स्पर्धात्मकतेकडे जाणारा नवा मार्ग उघडणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Advertisement
Advertisement