Published On : Sat, Jun 20th, 2020

एमएसएमईत परकीय गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी

ऊर्जा फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: कोरोनामुळे अर्थव्यवस्थेच्या आर्थिक चक्राची गती कमी झाली आहे. यातून मार्ग काढून आर्थिक चक्र गतिशील करावे लागणार आहे. उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक आली आणि बाजारात पैसा खेळता असला पाहिजे. सर्वसामान्याची क्रयशक्ती वाढली तरच हे आर्थिक चक्र गतिशील होईल. यासाठी एमएसएमईमध्ये परकीय गुंतवणूक आणून अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

आज दुपारी ऊर्जा फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फसन्सच्या माध्यमातून ई संवाद साधत होते. कोरोनाचा एमएसएमईवर परिणाम आणि भविष्यातील संधी हा विषयावर ते पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करीत होते. राज्य आणि केंद्र शासनाचे अर्थसंकल्प तुटीचे येण्याची शक्यता लक्षात घेता उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्थचक्राची गती वाढणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले- यासाठीच 50 हजार कोटींची व्यवस्था एमएसएमईमध्ये करून ठेवण्यात आली आहे. ज्या उद्योगांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चांगला आहे. त्यांचे ‘रेटिंग’ करणार व त्यांना स्टॉक एक्स्चेंजमध्ये आणणार.

जे उद्योग शेअर बाजारात जातील त्यांना 15 टक्के ‘इक्विटी’ शासन देणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूसही एमएसएमईत गुंतवणूक करू शकेल. तसेच परकीय गुंतवणूकही करता येणार आहे. एमएसएमईत जगातील गुंतवणूक आली तर उद्योग स्वत:च्या पायावर उभे राहतील. यासाठी आता एमएसएमईच्या योजनांसाठी सहकारी क्षेत्रातील सर्व बँका कर्ज देऊ शकतात. उद्योगांना कर्ज मिळेल अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

लहान लहान उद्योजक, भाजीवाले, व्यवसायी यांना एक लाख रुपयांच्या आतच कर्ज पाहिजे असते. अशा उद्योगांना सहकारी बँका कर्ज देतील. सर्वांना अर्थव्यवस्थेत कसे आणता येईल याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- एनबीएफसीला परकीय गुंतवणूक कशी येईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कोरोनाचा पायाभूत सुविधांवर कोणताही परिणाम नाही. आमची कामे सुरु आहेत. येत्या 5 वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उत्पन्न 1 लाख कोटींपर्यंत जाईल. बाजारात पैसा आला तर सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आणि गरीब माणसाच्या खिशात पैसा आला तर अर्थव्यवस्था गतिशील होईल. निर्यात वाढेल आणि आयात कमी होईल.

आजच्या स्थितीत सकल राष्ट्रीय उत्पन्ना एमएसएमईचा 29 टक्के सहभाग आहे. 11 कोटी रोजगार या विभागाने दिला आहे. निर्यातीत आमचा सहभाग 48 टक्के आहे, असे सांगून ते म्हणाले- आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर कोरोनाचा कोणताही परिणाम झाला नाही. मुंबई दिल्ली या हरित मार्गाची आखणी करताना आम्ही 16 हजार कोटींची बचत केली आहे. याशिवाय 22 हरित महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. आमची कामे जोरात सुरु आहेत, असेही ते म्हणाले.