Published On : Tue, Jun 9th, 2020

फाऊंड्री उद्योजकांनी एमएसएमईत नोंदणी करावी : नितीन गडकरी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाऊंड्रीमेन पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: फाऊंड्री उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून या व्यवसायातील उद्योजकांनी आधी एमएसएमईमध्ये आपली नोंदणी करावी. त्यानंतर एमएसएमईच्या योजनांचा लाभ या उद्योगाला देणे शक्य आहे. एमएसएमईची व्याख्या आता बदलली असून लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसाठी अनेक योजना आहेत, त्याचा लाभ फाऊंड्री व्यवसायातील उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

Advertisement

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाऊंड्रीमेन या संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी ई संवादाच्या माध्यमातून चर्चा केली. निर्यातीची तयारी आणि कमी उत्पादन खर्च यासाठी प्रयत्न केल्यास या व्यवसायातील उद्योजक निर्यात करू शकतात, याकडे लक्ष वेधताना गडकरी म्हणाले- वाहतूक खर्चात कपात केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. एमएसएमईच्या योजनांचे कक्ष आता रुंदावले आहेत. एमएसएमईच्या योजनांसाठी आता सहकारी बँका, जिल्हा बँका, राज्य सहकारी बँका, खाजगी बँका आणि राष्ट्रीय बँकाही कर्ज देऊ शकतात. पण या विभागाकडे नोंदणीच नसेल तर त्याचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय नवीन भागभांडवल उभे करण्यासाठी एमएसएमई स्टॉक एक्स्चेंजही लवकरच येणार आहे. फाऊंड्री उद्योगात निर्यातक्षम उद्योगांना एमएसएमईतून अधिक फायदे होऊ शकतात, असेही गडकरी म्हणाले.

उद्योगांनी निर्यातीची तयारी करताना उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर अधिक भर देताना गडकरी म्हणाले- उत्पादन खर्च कमी झाला तर वस्तूची किंमत कमी होते व त्याला बाजारात सक्षमपणे उभे राहणे शक्य होते. यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे. वीज वापराबद्दल बोलताना गडकरी म्हणाले- या उद्योगाने रात्रीच्या वेळी वीज वापरली तर वीज पुरेशा प्रमाणात मिळेल व रात्रीच्या विजेचे दरही कमी असतील. वास्तविक वीज हा विषय राज्य शासनाशी निगडित आहे. तसेच शासनाचे भंगार संदर्भातील धोरण अजून प्रलंबित असून लवकरच ते जाहीर होईल त्याचा निर्णय आम्ही करणार आहोत.

भंगाराबाबत बोलताना ते म्हणाले- या उद्योगातील भंगारावर पुन्हा प्रक्रिया करून ते उपयोगात आणता येते. प्रक्रिया करण्यामुळे फाऊंड्री उद्योगाला फायदाच होणार आहे.

फाऊंड्री उद्योगात ट्रकचे प्रमाण अधिक आहे. डिझेलचे ट्रक जर एलएनजीवर आणता आले तर 50 टक्के इंधन खर्चात बचत होईल. एलएनजीवर ट्रक आणण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च येतो. पण इंधनात होणार्‍या बचतीमुळे सुमारे दीड वर्षात हा खर्च वसूल होतो, असे सांगताना गडकरी म्हणाले- आता तर आम्ही इलेक्ट्रिक कार, स्कूटर, मोटर सायकल, बस यांना प्राधान्य देत आहोत. त्यामुळे इंधनावरील खर्चात बचत तर होईलच पण प्रदूषणही होणार नाही. हवेतील प्रदूषण, पाण्यातील प्रदूषण या संदर्भात शासनाने जे निर्देश आणि नियम घातले आहेत, ते पूर्णपणे पाळले गेले पाहिजे.

लोकांमध्येही आताा याबद्दल अधिक जनजागृती आली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात संकटातून बाहेर पडण्यासाठी पुरेशी क्षमता आहे. या काळाचा फायदा घेता आला पाहिजे. फाऊंड्री उद्योगाने आपल्या उद्योगाचे एक क्लस्टर करून पोर्टनजिक हे क्लस्टर सुरु केले पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग तयार करताना आम्ही महामार्गाशेजारी असलेल्या जमिनीवर विविध सुविधा असलेल्या योजना सुरु करणार आहोत. तेथे विविध उद्योगांचे क्लस्टर, पोर्ट, रेल्वे, विमानतळ, स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा योजना असतील. तेथे वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धतता असेल. या ठिकाणी फाऊंड्री उद्योजकांनी आपले क्लस्टर सुरु केल्यास फायदेशीर असेल, असेही ते म्हणाले.

एमएसएमईने आता ‘चॅम्पियन’ नावाचे वेब पोर्टल सुरु केले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोर्टलचा शुभारंभ झाला असून आता उद्योगांना भेडसावणार्‍या समस्या आणि तक्रारी या पोर्टलच्या माध्यमातून सोडवल्या जातात. आतापर्यंत 50 हजार तक्रारी या पोर्टलवर नोंदल्या गेल्या असून यापैकी 80 ते 90 टक्के तक्रारी सोडविण्यात आल्याचेही गडकरी शेवटी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement