नागपूर: नागपूर येथे येत्या 7 फेब्रुवारी पासून येथील मध्यवर्ती संग्रहालयात होणाऱ्या शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाच्या पूर्व तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, पोलीस विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथे होणाऱ्या या ऐतिहासिक समारंभासाठी येथील सन्माननिय भोसले घराण्यातील सदस्यांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष निमंत्रण दिले जात आहे. जिल्ह्यातील सन्माननिय इतिहास संशोधक, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ यांनाही निमंत्रित केले जात असून मुख्य समारंभ हा सुरेश भट सभागृहात येत्या 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय लंडन येथून आणलेले वाघनखे हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. यासमवेत शिवशस्त्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल आहे. संबंधित विभागांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी स्वत: लक्ष देऊन पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले.