Published On : Wed, Oct 30th, 2019

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज (दि. ३०) राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या उच्चाटनाला प्राधान्य दयावे लागेल, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाविरुध्द लढण्यासाठी “लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही” तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस कर्मचारी यांना दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त “सत्यनिष्ठा प्रतिज्ञा” दिली, तसेच राज्यपालांच्या संदेशाचे वाचन केले.


दि. २८ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता, जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून “प्रामाणिकपणा- एक जीवनशैली” असे या सप्ताहाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे.