Published On : Thu, Jun 7th, 2018

आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नामांकित इंग्रजी शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याचे विष्णू सवरा यांचे निर्देश

मुंबई: आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांच्या विविध समस्या प्राधान्याने मार्गी लावा, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मंत्रालयात आदिवासी मुलांच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार हेमंत पाटील, माजी आमदार शिवराज पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, अपर आयुक्त गिरीश सरोदे, अपर आयुक्त नागपूर ऋषिकेश मोडक, उपआयुक्त एम. ए. शेख, संस्थाचालक दिलीप पाटील, गिरीश जाधव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या संचालकांनी आदिवासी मुलांच्या नामांकित शाळा चालविताना येणाऱ्या अडचणी बैठकीत मांडल्या.श्री. सवरा म्हणाले, आदिवासी मुलांना इतर समाजासोबत राहता यावे व इतर मुलांच्या बरोबरीने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, या उद्देशाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासंबंधीची योजना राज्यात 2010-11 या वर्षापासून कार्यान्वित आहे.

त्यामुळे आदिवासी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल तसेच त्यांचे राहणीमान उंचावेल व मुलांचा सर्वांगीण विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.