Published On : Sat, Aug 5th, 2017

तडजोड शुल्काऐवजी वीजचोरांवर गुन्हे दाखल करा


नागपूर: वीजचोरी करणा-या ग्राहकांकडून तडजोड न स्विकारता विद्युत कायद्याच्या कलम 135 मधील तरतुदीनुसार त्यांचेवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याच्या सुचना महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अमरावती अकोला या पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

बरेच ग्राहक वीजचोरी करतांना विचार करीत नाहीत मात्र पकडल्या गेल्यावर बदनामीच्या भितीपोटी लगेच दंड आणि तडजोड शुल्क भरून मोकळे होतात याशिवाय या वीजचोरी मागिल मास्टरमाईंड बिनधोक सुटतो आणि इतर ग्राहकांना वीजचोरी करण्यास मदत करतो, असा प्रकार टाळण्यासाठी अधिकाधिक वीजचोरांवर गुन्हे दाखल करून त्यांचेवर कायदेशिर कारवाई केल्यास मास्टरमाईंडचे नाव पुढे येऊन वीजचोरीस मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे मत खंडाईत यांनी यावेळि व्यक्त केले. वीजचोरी पकडतांना थातूरमातूर कारवाई न करता महावितरणची वीजेच्या युनिट्सची विक्री वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधितांना केल्या.

एजन्सीने दिलेल्या मीटर रिडींगपैकी 5 टक्के नोंदी आपल्या स्तरावर क्रॉसचेक करून मीटर रिडींग करणा-या एजन्सीची किंवा त्यांच्या कर्मचा-यांनी त्यांच्या कामात कुचराई केल्याचे आढळल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करा, अश्या सुचनाही प्रादेशिक संचालकांनी यावेळी दिल्या. कृषीसह सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाच्या जास्तीतजास्त नोंदी करण्यावर भर देतांनाच यामुळे ग्राहकांना होणारे फ़ायदे त्यांना समजावून सांगण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. आपले काम स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता त्याचे योग्य वाटप आणि नियोजन केल्यास वीज ग्राहकांना त्यांचा अधिक लाभ होईल, संथ गतीने फ़िरणा-या मीटरची ॲक्युचेक तपासणी करतांना गरज भासल्यास यासाठी एजन्सीची मदत घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

ग्राहकांना पारदर्शक, त्वरीत आणि ग्राहकाभिमुख सेवेसाठी महावितरणच्या मोबाईल ॲप वापर वाठवा ॲपच्या माध्यमातून नवीज वीज जोडण्या देण्यात याव्यात, वीज वाहिन्या आणि उच्चदाब ग्राहकांकडील स्वयंचलीत मीटर वाचन पद्धती योग्य करून घेणे, ऑनलाईन वीज भरणाचे प्रमाण वाढ़विण्यात यावे, वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला आळा घाला, थकबाकी वसुली करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही खंडाईत यांनी दिले, यावेळी जुलै महिन्यात प्रशंसनिय कार्य करणा-या आलापल्ली आणि वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंते अमित परांजपे आणि उत्त्म उरकुडे, चंद्रपूर मंडलचे अधीक्षक अभियंता हरिष गजबे, चंद्रपूर परिमंडल यांचेसोबतच वर्धा येथे 31 लाखाची वीजचोरी उघडकीस आणणारे अतिरीक्त कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांचा विशेष गौरव प्रादेशिक संचालक यांच्या हस्ते करण्यात आला.


याप्रसंगी मुख्य अभियंते दिलीप, घुगल, जिजोबा पारधी, किशोर मेश्राम, सुहास रंगारी, अरविंद भादीकर यांचेसह पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.