नागपूर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ज्या ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींनी उल्लेखनीय कार्याचे योगदान दिले, अशा मान्यवरांच्या सत्कारातून आम्हाला प्रेरणा मिळते, असे भावपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने साई सभागृहात नागरिक कृतज्ञता सोहळ्याअंतर्गत भाव कृतज्ञतेचा सत्कार मान्यवराचा कार्यक्रम गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर गिरीश गांधी, माजी खा. दत्ता मेघे, बाबुराव तिडके, हरिभाऊ नाईक, शिरीष सहस्रभोजनी, श्रीमती सीमा साखरे, केशवराव शेंडे, मधुकर वासनिक, यादवराव देवगडे, राम खांडवे, लक्ष्मणराव जोशी, मेघनाथ बोधनकर, अॅड. विजय डागा आदी मान्यवर उपस्थित होते. योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल योगपटू विठ्ठलराव जीभकाटे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्र उभारणीसाठी आणि मजबुतीसाठी ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्राच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले, त्यांची उंची हिमालयाएवढी मोठी असल्याचे सांगताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- या मान्यवरांच्या कार्याला उजाळा देण्याची संधी या कार्यक्रमामुळे आली आहे. आज महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ही एक अनोखी बाब आहे. राष्ट्रासोबतच माणसे घडविण्याचे कामही या मान्यवरांनी केले असल्यामुळेच त्यांच्या कार्याची समाजानेही दखल घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे विश्वश्त गिरीश गांधी यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले.









