
नागपूर : नेल्को सोसायटीतील विविध नागरी समस्यांबाबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता. २४) दौरा करून पाहणी केली व नेल्को सोसायटी नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नेल्को सोसायटी नागरिक समितीने नेल्को सोसायटीमधील काही नागरी समस्यांबाबत निवेदन दिले होते. या अनुषंगाने आयुक्तांनी या भागाची पाहणी केली. यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपसंचालक नगररचना श्री. गिरीश गोडबोले, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता श्री. आशिष तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, उप अभियंता श्री. उमेश मदने लक्ष्मीनगर झोनचे झोनल स्वच्छता अधिकारी श्री. ऋषीकेश इंगळे उपस्थित होते.
यात नेल्को सोसायटी मधील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, डांबरीकरण व फुटपाथवर पेव्हर ब्लॉक्स लावण्यात यावे, या भागातील विवेका हॉस्पिटलच्या समोरच्या भागात एक जलवाहिनी फुटलेली असल्याने पाणी साचत असल्याची तक्रार निवेदनात केली होती. त्याचप्रमाणे या सोसायटीतील मैदानावर प्राथमिक शाळा व वाचनालयासाठी असलेले आरक्षण हटवून खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावे तसेच या मैदानात नागरीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते.
नेल्को सोसायटी नागरिक समितीच्या तक्रारीच्या अनुषंगाने या सर्व नागरी समस्यांची आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. नागरी समस्यांचा निपटारा त्वरित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नेल्को सोसायटीतील खुल्या जागेवर विकास आराखड्यांमध्ये वाचनालय व प्राथमिक शाळेसाठी आरक्षण राखीव केलेले आहे. या भागात मुलांना खेळण्यासाठी कोणतेही दुसरे खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याने विकास आराखड्यातील आरक्षण हटवून केवळ खेळाच्या मैदानासाठी ही जागा राखीव करावी, अशी मागणी सोसायटीच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. या संदर्भात सोसायटीने प्रस्ताव संमत करून तो महानगरपालिकेकडे पाठवावा. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. सोसायटीच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्री. प्रमोद तभाने, सोसायटीचे सचिव श्री. मनोहर पांडे, श्री. विजय नाईक, श्री. पी. एम. ब्राम्हणकर, श्री. केशव कोसे, श्री. देवलाल कोरडे, श्री. मोहन पांडे यांच्यासह सोसायटीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनपाचे उपअभियंता श्री. अभिजीत नेताम, अभियंता श्री. शीतल रंगारी, अभियंता श्री. महेंद्र सुरडकर, स्वच्छता निरीक्षक श्री. दिनकर गजभिये व श्री. आकाश रंगारी उपस्थित होते.
क्रिकेटचा आनंद
नेल्को सोसायटीच्या खेळाच्या मैदानावर पाहणीच्यावेळी १४ वर्षांखालील मुलांची क्रिकेटचा सामना सुरू होता. यावेळी नेल्को सोसायटीच्या सदस्यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना क्रिकेटचा फटका मारण्याची विनंती केली. आयुक्तांनी या आग्रहाचा मान राखत बॅट हाती धरली, गोलंदाज प्रमोद तभाने यांनी टाकलेल्या चेंडूला फटका मारून आयुक्तांनी क्रिकेट खेळाचा आनंद घेतला.








