Published On : Thu, Feb 7th, 2019

‘मेअर इनोव्‍हेशन अवॉर्ड’चे वितरण २ मार्चला

नवसंकल्पना साकारणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही होणार सन्मान

Kavi Suresh Bhat Auditorium

नागपूर: महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या व शहरात प्रथमच होणाऱ्या ‘मेअर इनोव्‍हेशन अवॉर्ड’चे २ मार्चला वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार समारंभात नवसंशोधकांसह शहरातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून बदल घडवून आणणाऱ्या ५० व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी पत्रपरिषदेत दिली.

Advertisement

मनपा मुख्यालयात महापौर कक्षात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, ‘मेअर इनोव्‍हेशन अवॉर्ड’ अंतर्गत नुकतेच हॅकॉथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या हॅकॉथॉनमध्ये सुमारे १२०० नवसंकल्पनांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यातील ७५० नवसंकल्पनांचे सादरीकरण कविवर्य सुरेश भट सभागृहात १ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘हॅकॉथॉन’ दरम्यान करण्यात आले. या संकल्पनांमधील बहुतांश संकल्पना या फारच नावीन्यपूर्ण आहेत. या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग शहराच्या शाश्वत विकासासाठी होणार आहे. सादरीकरण करण्यात आलेल्या ७५० नवसंकल्पनांचा विस्तृत अभ्यास करून तज्ज्ञ परीक्षकांमार्फत यामधील उत्कृष्ट १०० नवसंकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट संकल्पनांचे ‘प्रोजेक्ट’मध्ये रुपांतर करण्यात येईल. यामधील प्रत्येक गटातील उत्कृष्ट नवसंकल्पनांना ‘मेअर इनोव्‍हेशन अवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त नवसंकल्पना पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॅकॉथॉनच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेकडे आलेल्या नवनवीन संकल्पनांचा उपयोग मनपाकरिता कसा करता येईल याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी आपण स्वत: विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. नागपूर शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागात चार नियोजित महाविद्यालयांमध्ये हा संवाद कार्यक्रम घेण्यात येईल. या संवाद कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘ब्रेनस्टॉर्मींग’ सत्र आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत महापौरांसह ‘मेअर इनोव्‍हेशन कौन्सिल’चे सदस्य शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील व त्यांच्या संकल्पनांचा मनपाला कसा उपयोग होईल, याबाबत चर्चा करतील. ‘मेअर इनोव्‍हेशन कौन्सिल’तर्फे शहरातील नवसंशोधक विद्यार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारीला पेटेंट आणि कॉपी रॉईट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला उपायुक्त नितीन कापडणीस, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू, केतन मोहीतकर उपस्थित होते.

नवसंकल्पना साकारणाऱ्या व्यक्तींकडून ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित
आपल्या संशोधन, कार्य व योगदानामुळे शहराचा नावलौकिक करणाऱ्या शहरातील विविध क्षेत्रातील ५० व्यक्तींचाही यामाध्यमातून सन्मान व्हावा यासाठी ‘मेअर इनोव्‍हेशन कौन्सिल’ने पुढाकार घेतला आहे. यासाठी विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या, विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींकडून ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहे. नवीन संकल्पना मांडून त्याचे पेटेंट मिळविणारे तसेच आपल्या कार्याद्वारे विविध पुरस्कार पटकाविणाऱ्या मान्यवरांनी www.mayorinnovationawards.in ह्या वेबसाईट वर जाऊन यासाठी प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement