Published On : Mon, Sep 14th, 2020

सिवर लाईन व चेंबर्स देखभाल, दुरूस्ती कामाची निविदा प्रक्रिया सुरू करा

Advertisement

स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे निर्देश

नागपूर: नागपूर शहरात उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करण्यात आले आहेत. या तिनही झोनमध्ये अनेक ठिकाणी सिवर लाईन खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सिवर लाईन व चेंबर्स दुरूस्ती आणि देखभाल कामाचे प्रकल्प तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत तिनही सिवर झोनमधील मल:निस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सदर कामाची आवश्यक निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरात उत्तर, मध्य व दक्षिण सिवरेज झोन अंतर्गत सिवर लाईन व चेंबर च्या देखभाल कार्याबाबत महापौरांमार्फत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात समितीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, प्रभारी कार्यकारी अभियंता (सांडपाणी व्यवस्थापन) राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री धनंजय मेंढुलकर, अनिल गेडाम, विजय गुरूबक्षानी व दिलीप बिसेन आदी उपस्थित होते.

नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साउथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूननगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तिनही झोनमधील सिवर लाईनच्या दुरूस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमी ची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले की, तिनही झोन अंतर्गत कामे मंजुरीनंतर रीतसर तीन स्वतंत्र निविदा बोलावून करण्यात येतील. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत अस्तित्वातील व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सिवरलाईन व चेंबर्सचे संपूर्ण नकाशे तयार करून घेण्यात येतील. कामात गती आणि सुसूत्रता येण्यासाठी नियुक्त कंत्राटादाराला प्रत्येक प्रभागात ४ कामगार व एक सुपरवाईजर ची टिम देणे अनिवार्य राहिल. प्रत्येक झोनच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत दैनंदिन स्वरूपात देण्यात येणा-या मागणी पत्रकाप्रमाणे कंत्राटदाराकडून प्रभागनिहाय काम पूर्ण करून घेणे अनिवार्य राहिल, असेही त्यांनी सांगितले.

सदर प्रकल्प शहरातील नागरिकांना भेडसावणा-या सिवर लाईनच्या समस्या लक्षात घेवून दूरदृष्टीने तयार करण्यात आला आहे. त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येणार आहेत. अनेक ठिकाणी सिवर लाईनवर अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई आतापासून सुरू करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने झोनस्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात यावी. याशिवाय ज्या प्रभागात काम करावयाचे आहे, त्या प्रभागातील संबंधित नगरसेवकांना प्रकल्पाची माहिती देण्यात यावी व आवश्यक ठिकाणी त्यांचे सहकार्य घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

Advertisement
Advertisement