Published On : Mon, Sep 14th, 2020

लवकर निदान, तातडीने उपचार करा ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.अविनाश गावंडे यांचे आवाहन

नागपूर: कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. मात्र त्याला घाबरण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त योग्य काळजी घेण्याची. कोरोनापूर्वी त्यापेक्षाही अनेक मोठ्या धोकादायक साथरोगांचा आपण सामना केला आहे. स्वाईन फ्ल्यू सारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये मृत्यूदर जास्त होता. कोरोनामध्ये तो नाही, मात्र संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहेच शिवाय फिजिकल डिस्टंसिंग ठेवणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि प्रत्येक तासाला साबणाने स्वच्छ हात धुणे अत्यावश्यक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि आपण त्याचे वाहन होण्यापासून टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचेच आहे. शिवाय ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास, दम लागणे अशी काही लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा त्वरीत कोव्हिड चाचणी करून घ्यावी. लवकर निदान केल्यास आपल्याला तातडीने उपचार मिळेल व आपण धोक्यामधून बाहेर येउ, त्यामुळे लक्षणे लपवू नका, चाचणी करा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश गावंडे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये सोमवारी (ता.१४) त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी न्यूरॉन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या.

‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यावेळी डॉ. अविनाश गावंडे यांनी उत्तरे देउन शंकांचे निरसरन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, पालकांनी कसे वागावे अशा अनेक प्रश्नांसह नागरिकांकडून उपस्थित केलेल्या अनेक शंकांचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ न्यूरॉन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. मंजुषा गिरी यांनी निरसन केले.

कोव्हिडच्या या संकटात लहान मुलांची जास्त काळजी घ्या. लहान मुलांना वाहनांवरून बाहेर फिरविणे टाळा. ज्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे शक्य नाही, अशा वस्तूंपासून स्वत:ही दूर राहा व मुलांनाही दूर ठेवा. लहान मुले पालकांचे अनुकरण करतात, त्यामुळे हा काळ त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा आहे. जबाबदारीची वागणूक करा व मुलांमध्येही ती अंगीकारा, असा सल्लाही डॉ.अविनाश गावंडे यांनी दिला.

कोव्हिडच्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांचा अहवाल मिळताच डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक काळजी घ्या. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मला काहीच होउ शकत नाही, अशी भावना ठेवू नका. नियमांचे योग्य पालन हेच कोरोनापासून दूर राहण्याचे मोठे सूत्र आहे, त्यामुळे काळजी घ्या. योग्य आहार घ्या, असे आवाहनही डॉ.अविनाश गावंडे यांनी केले.