Published On : Mon, Jun 28th, 2021

अतिक्रमणाच्या विरोधात मनपा-पोलिसांची धडक कारवाई सुरू करा : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

– टोईंग व्हॅन भाडयाने घेणार : रस्ते व नदीलगतचे अतिक्रमण हटणार

नागपूर : शहरातील रस्ते आणि नदीलगत चारचाकी व दुचाकी वाहन दुरुस्ती करणा-या व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होउन अपघाताचा धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात येणा-या तक्रारी आणि अडथळे तातडीने दूर व्हावेत यासाठी नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाने यासंदर्भात तातडीने संयुक्तरित्या धडक कारवाई सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच जुनी दुचाकी वाहन फुटपाथवर ठेवून विकणारे दूकानदारांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैद्यनाथ चौक ते जगनाडे चौकापर्यंत जुन्या दुचाकी व चारचाकी वाहन विक्रीची दुकाने असून येथील व्यावसायिक निर्धारित जागेऐवजी रस्त्यावर अतिक्रण करून वाहने ठेवत असल्याची तक्रार नगरसेवकांनी सभागृहात केली होती. यावर सदर जागा नागपूर सुधार प्रन्यासची असून त्यांच्याद्वारे कारवाई अपेक्षित असल्याचे उत्तर अधिका-यांमार्फत देण्यात आले होते. यावर सभागृहात महापौरांनी गंभीर दखल घेत सदर प्रश्न सोडवून कार्यवाही करण्याबाबत पोलिस विभागासोबत तातडीने बैठक बोलाविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये विशेष बैठक घेण्यात आली.

बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वाहतूक पोलिस निरीक्षक दीपक साखरे, संजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत जाधव, प्रादेशिक परिवहन विभागाचे मार्तंड नेवसकर, मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील आदी उपस्थित होते.

महापौरांनी सांगितले की, शहरात वाहनांची दुरुस्ती करणारे, त्याची डेंटिंग-पेटिंग करणारे वर्कशॉप सगळीकडे उघडले आहेत. अग्रसेन चौक ते चिटणीस पार्क मार्गावर सुध्दा जुनी दुचाकी वाहाने फुटपाथवर ठेवून विक्री केली जात आहे. नागपूर मनपाला वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार नाही. मनपा सोबत नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली तर फुटपाथवर वाहन विकणा-यांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच अनेक ठिकाणी निरुपयोगी, नादुरुस्त वाहनांची रस्त्यावर अवैध पार्किंग करण्यात आली आहे यांच्यावर सुध्दा कडक कारवाई करण्यात यावी.

महापौरांनी वाहनांमध्ये किरकोळ परिवर्तन करुन चायनिज व अन्य खाद्यपदार्थ विकणा-या वाहन मालकांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक परिवहन विभागाचा नियमाप्रमाणे वाहनांमध्ये बिना परवानगीने कोणतेही परिवर्तन करणे अवैध आहे आणि या नियमांतर्गत सगळया वाहनांवर कारवाई करण्यात यावी.

बैद्यनाथ चौक ते जगनाडे चौक यासोबतच चिटणीस पार्क ते अग्रेसन चौक येथील मार्गावरही व्यावसायीकांकडून होत असलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झालेल्या आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये अशा स्वरूपाचे अतिक्रमण व्यावसायीकांकडून केले जात आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये संबंधित सहायक आयुक्तांमार्फत सर्वे करण्यात यावे. या सर्वेद्वारे रस्ते तसेच नदी काठावर करण्यात आलेल्या व्यावसायीक अतिक्रमणाची माहिती गोळा करून तेथे वाहतूक पोलिस विभागासह संयुक्तरित्या कारवाई करण्यात यावी. यासोबतच अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त करण्यात येणारी वाहने व इतर साहित्य ठेवण्याकरिता झोनमध्ये जागा शोधून तिथे ते साहित्य जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सर्व सहायक आयुक्तांना दिले.

कारवाईमध्ये रस्त्यावर असलेली वाहने जप्त करण्याकरिता ‘टोईंग व्हॅन’ उपलब्ध नसल्याची माहिती यावेळी वाहतूक पोलिस अधिका-यांकडून देण्यात आली. अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेता तातडीने अतिक्रमण हटविले जावे यासाठी मनपा तर्फे टोईंग व्हॅन विकत घ्या आणि जोपर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत भाड्याने ‘टोईंग व्हॅन’ घेउन कार्यवाही सुरू करण्यात यावे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी बजावले. त्यांनी पोलिसांना जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी प्रत्येक झोन मध्ये जागा उपलब्ध करण्याचे निर्देश ही दिले.

सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी मनपा व पोलिसांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, फुटपाथवर सामान विकणारे व खाद्यपदार्थ विकणारे हॉकर्सचा विरोधात कारवाई आवश्यक आहे. कारवाई झाल्यानंतर जर हे हॉकर्स पुन्हा रस्त्यावर आले तर त्यांचाविरोधात पोलिस ठाण्यात रिपोर्ट करु शकतो. विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी रस्त्यावर जनरेटर लावून सामान विकणारे व्यवसायिकांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement