Published On : Fri, Jul 12th, 2019

रेल्वे गाड्यांची माहिती आता व्हिडीओ वॉलवर

Advertisement

रेल्वे स्थानकावर सात ठिकाणी असेल व्यवस्था

नागपूर: प्रवाशांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वे एक पाऊल पुढे असते. त्याचाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे गाड्यांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डीजिटल यंत्रणा सुरू केली आहे. यापुढे व्हिडीओ वॉलवर रेल्वे गाड्यांची माहिती मिळणार आहे. या व्हिडीओ वॉलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या हस्ते गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आरक्षण कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले.

कोणती रेल्वे किती उशिराने येणार, कोणत्या फलाटावर लागणार यासाठी प्रवाशांना धावपळ करण्याची गरज नाही. रेल्वे प्रशासनाच्यावतीने अशा प्रकारची व्हिडीओ वॉल रेल्वेस्थानकावर सात ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

यामुळे प्रवाशांना उपयुक्त माहिती मिळण्यास सोयीचे होणार आहे. ९०५ चौरसफुटांच्या जागेत आरक्षण कार्यालयाच्या शेजारी व्हिडीओ वॉलची स्थापना करण्यात आली आहे. यात अर्धावेळ प्रवाशांसाठी उपयुक्त माहिती आणि अर्धा वेळ व्यावसायिक वापर करण्यात येणार आहे. त्यापासून रेल्वेला वर्षभरात १६.५१ लाखाचा आणि ५ वर्षात ८७ लाख ६६ हजार ८१० रुपयांचा महसूल मिळणार आहे. व्हिडीओ वॉलच्या शुभारंभप्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, अधिकारी उपस्थित होते.