Published On : Sat, Aug 18th, 2018

युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यंत युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर : शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यंत समाजसेवेची आवड असणाऱ्या युवकांच्या माध्यमातून पोहचविणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. युनिसेफच्या सहकार्याने आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटक राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयूक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदग्‍ल, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्यय, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे, ‘मनरेगा’चे आयुक्त एस.आर.नायक, अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते

Advertisement

शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्येष्ठ नागरीक अशा विविध समाज घटकांसाठी शासन राबवित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य म्हणून संबंधित कुटुंबांना द्यावी अशी ही योजना आहे. माता-बाल संगोपन, आरोग्य, लसीकरण, शिक्षण, स्वच्छता यासंदर्भातही युवकांनी जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही ऐच्छिक योजना आहे. या करिता ‘युवा माहिती दूत’ या प्ले स्टोरवरील अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावयाची आहे.

युवा माहिती दूत झालेल्या युवकाने सहा महिन्यात 50 घरी जाऊन त्या कुटुंबाला लागू पडतील अशा योजनांची माहिती द्यावयाची आहे आणि त्याचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा, याबद्दल माहिती द्यावयाची आहे. राज्यातील सुमारे 1 लाख विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाचे माहिती दूत म्हणून ओळखपत्र मिळेल आणि प्रमाणपत्र मिळेल.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका विशेष समारंभात या योजनेच्या संकल्पनेचे स्वागत केले. तरूणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद युवा वर्गामध्ये आहे. महाविद्यालयांनी शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांना देण्यासाठी आठवड्यातून एक तास ठेवावा,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

या उपक्रमाची माहिती देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाअंतर्गत किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या युवकांमार्फत किमान 50 लाख लाभार्थ्यांशी म्हणजेच किमान अडीच कोटी व्यक्तिंशी शासन जोडले जाईल. युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसारासाठीही याचा लाभ होईल.

शासकीय योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम युवा माहिती दूत करणार असल्याने शासन करीत असलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना कळू शकणार आहे. त्याचबरोबर अनेक योजनांचा लाभही त्यांना घेता येईल.

युवा माहिती दूत हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत असून यासाठी तालुकास्तरावर युवा माहिती दूत समन्वकाची निवड करण्यात येणार आहे. त्यांचामार्फत सामाजिक कार्याचे आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गावापर्यंत जावून 50 घरांना भेटी द्यायचे आहे.

या भेटीमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती पोहचवायची असून या उपक्रमामध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. युवा माहिती दूत या उपक्रमाअंतर्गत मोबाईल ॲप तयार करण्यात आला असून यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती अत्यंत सुटसुटीत व सोप्या पध्दतीने देण्यात आल्या. शासनाचे योजना सहज व सूलभपणे थेट सामान्यापर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी युवकांनी आपल्या महाविद्यालयामार्फत जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन क्र.1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधता येईल.

Advertisement
Advertisement
Advertisement