Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 14th, 2020

  उद्योगांचा विकास, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : नितीन गडकरी

  पंजाब-हरयाणा विद्यापीठ प्राध्यापक, संशोधकांशी संवाद

  नागपूर: नवीन संशोधन, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांचा विकास करण्यास तसेच आयातीत वस्तूंसाठी पर्याय निर्माण करून आयात कमी करून निर्यात वाढविणे, अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यत केले.

  पंजाब-हरयाणा विद्यापीठाच्या प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांशी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी प्रख्यात व्याख्याते मुकुल कानिटकर व श्री राजकुमारजी उपस्थित होते. कोविडमुळे संपूर्ण जगासमोर संकट निर्माण झाले आहे. सर्वच क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेसमोर एक आव्हान निर्माण झाले असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- अशा स्थितीत भय निराशेच्या गर्तेत जाणार्‍या समाजाला बाहेर काढून सकारात्मकता व आत्मविश्वास प्रस्थापित करण्याचे राष्ट्रीय काम आपले आहे. संकटांवर मात करीत पुढे जाण्याचा आमचा इतिहास आहे. ‘राष्ट्र विजयी हो हमारा’ या पध्दतीनेच आपण संकटांचा सामना केला. या संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक लढाईही आम्ही जिंकूच हा विश्वासही त्यांनी व्यत केला.

  राष्ट्र सर्वोपरी, सुखी, संपन्न व शतिशाली राष्ट्र निर्माण करणे हा आमच्या विचाराचा पाया आहे. आम्ही विस्तारवादी नाही. संपूर्ण जगाचे कल्याण हीच आमची विचारधारा, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले-बेरोजगारी आहे म्हणून गरिबी आहे. योग्य दृष्टिकोन असेल व योग्य नीती असेल तर हा देश आर्थिक ताकद बनू शकतो. उद्देश निश्चित असेल तर मार्गही निश्चित असला पाहिजे. आमची क्षमता काय आहे, आमच्यात कमतरता कोणत्या आहेत, या जाणून घेतल्या पाहिजेत. लोकसंख्या अधिक आहे. देशात बाजारपेठ मोठी आहे. पाणी, ऊर्जा, दळणवळणाची विविध साधने आणि संवाद माध्यमे आपल्याकडे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. पुरेशी वीज आहे, जैविक तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे, याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असेही ते म्हणाले.

  सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि कृषी क्षेत्राची प्रगती याबद्दल चिंताग्रस्त स्थिती आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कृषी क्षेत्राचा विकास, कृषी मालावर आधारित उद्योग, रोजगार निर्मिती करून गरिबी, भूकमरी दूर करून शाश्वत जीवनपध्दती या मार्गाने आपण जात आहोत. जोपर्यंत कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र आणि ११५ मागास जिल्ह्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार नाही, तोपर्यंत देशाचे कल्याण होणार नाही. सामाजिक आर्थिक चिंतनातून शोषित, पीडित दरिद्रीनारायणाला केंद्रबिंदू मानून शाश्वत जीवन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे आमचे परम कर्तव्य आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणती नीती स्वीकारावी लागेल हे लक्षात घेऊन आमच्या विद्यापीठांना आणि शिक्षण संस्थांना पुढे जावे लागेल. उद्योजक आणि विद्यापीठे यांचा समन्वय, सहकार्य आणि संवाद आवश्यक आहे. उच्च तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य, विज्ञान याचा उपयोग करून आपण उत्पादन खर्च कमी केला तरच आंतरराष्ट्रीय बाजाराशी स्पर्धा करू शकू याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145