
नागपूर – इंडिगोच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेला गोंधळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. देशभरातील विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय वाढत असून, अनेकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. काहींची उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्द होत असल्याने प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
नवीन फ्लाईट ड्युटी टाइम नियम लागू झाल्यानंतर कर्मचारी उपलब्धतेत अचानक तुटवडा निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम इंडिगोच्या वेळापत्रकावर झाला. दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या प्रमुख विमानतळांवर परिस्थिती गंभीर बनली. एवढेच नव्हे, तर मागणी वाढल्यामुळे काही मार्गांवरील भाडेदरही झपाट्याने वाढले.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नाराजीला उत्तर देत इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. ५ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान रद्द किंवा विलंबित झालेल्या उड्डाणांसाठी प्रवाशांना ‘पूर्ण रिफंड’ देण्यात येणार आहे. तसेच इच्छुकांसाठी अतिरिक्त शुल्काशिवाय पुनर्बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नियमानुसार, विमान कंपनीच्या चुकांमुळे फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशाला संपूर्ण रक्कम परत देणे बंधनकारक आहे. जरी तिकीट ‘नॉन-रिफंडेबल’ असले तरी कर आणि शुल्क परत मिळतात. पुनर्बुकिंग करताना कोणताही ‘चेंज फी’ आकारला जाणार नाही, हे इंडिगोने स्पष्ट केले आहे.
रिफंड मिळवण्याची प्रक्रिया कशी?
इंडिगोच्या अॅप किंवा वेबसाइटवरील Manage Booking मध्ये जाऊन PNR टाका.
फ्लाईटची सद्यस्थिती पाहा.
रिफंड घ्यायचा की पुढील उपलब्ध उड्डाणावर बुकिंग करायचे याची निवड करा.
ऑनलाइन पेमेंट असल्यास ५–७ दिवसांत रक्कम परत खात्यात येते.
रोख पेमेंट केले असल्यास प्रवाशांना विमानतळ काउंटरवर ओळखपत्रासह प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था-
गोंधळामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोकडून काही ठिकाणी हॉटेल, जेवण आणि वाहतूक सुविधा पुरवल्या जात आहेत. विमानतळांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करून मदत व मार्गदर्शन सेवा वाढवण्यात आल्या आहेत.
प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे इंडिगोने म्हटले असून, परिस्थिती लवकर सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.









