नवी दिल्ली: भारतानं पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या एअर स्ट्राईकमुळे भारतानं अवघ्या २३ मिनिटांत दहशतवाद्यांना जोरदार उत्तर दिलं.
मंगळवारी रात्री दीड वाजता ही कारवाई भारतीय वायुदलानं पार पाडली. ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांच्या अचूक फटक्यांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तळांना लक्ष्य केलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून आणि रॉच्या गुप्त माहितीनुसार या मोहिमेचं काटेकोर नियोजन करण्यात आलं होतं.
लक्ष्य केलेली ठिकाणं:
बहावलपूर (पाकिस्तान) – जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय, आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर.
मुरीदके (पाकिस्तान) – लष्कर-ए-तैयबाचं प्रमुख तळ, २६/११ हल्ल्याशी संबंधित.
गुलपूर (पीओके) – एलओसीपासून ३५ किमी दूर, जैशचं अड्डं.
सवाई कॅम्प (पीओके) – तंगधार सेक्टरमध्ये स्थित लष्करचा तळ.
बिलाल कॅम्प (पीओके) – जैशचं लॉन्चपॅड.
कोटली (पीओके) – लष्करचं मोठं शिबिर, ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांची क्षमता.
बर्नाला कॅम्प (पीओके) – एलओसीपासून १० किमीवर.
सरजाल कॅम्प (पाकिस्तान) – जैशचं प्रशिक्षण केंद्र, कठुआजवळ.
मेहमूना कॅम्प (सियालकोट) – हिज्बुलचं प्रशिक्षण शिबिर.
संरक्षण मंत्रालयानं अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं की, या कारवाईत पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी स्थळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. केवळ दहशतवादी तळांवर हल्ला केला गेला असून भारतानं अत्यंत संयमाने ही कारवाई केली आहे.
२०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राईकनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय हवाई दलानं थेट पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर कारवाई केली आहे.