नागपूर: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक गडद झाला असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्य तळांना लक्ष्य करत आहे. भारतही या कारवायांना कडक प्रत्युत्तर देत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) ऑपरेशन सिंदूरला आपला पाठींबा दर्शवला आहे.
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन करताना म्हटलं की, ही कारवाई देशाच्या स्वाभिमानाला आणि जनतेच्या मनोबलाला बळकटी देणारी ठरली आहे.
संघाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “पहलगाममध्ये निःशस्त्र हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानप्रायोजित दहशतवाद आणि त्यास पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेविरोधात केंद्र सरकार आणि सशस्त्र दलांनी घेतलेली निर्णायक भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे. या कारवाईमुळे पीडित कुटुंबीयांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळण्याची दिशा मिळाली आहे.”
संघाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर आणि त्यांचं पाठबळ देणाऱ्या प्रणालींवर चालवण्यात येणाऱ्या कारवायांना आवश्यक आणि अपरिहार्य ठरवलं आहे. “राष्ट्रीय संकटाच्या या काळात संपूर्ण देश सरकार आणि लष्करासोबत खंबीरपणे उभा आहे,असेही संघाने नमूद केलं आहे.
पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर धार्मिक स्थळे आणि नागरी वसाहतींवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत, या अमानवी आणि क्रूर कृत्यांतील पीडितांप्रती संघाने शोक व्यक्त केला आहे.
या संकटाच्या काळात संघाने देशातील सर्व नागरिकांना सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या पवित्र नागरिक कर्तव्यातून आपण सतर्क राहायला हवं, आणि समाजात फूट पाडणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्तींना यशस्वी होऊ द्यायचं नाही,असेही आवाहन करण्यात आले आहे.
संघाने नागरिकांना देशभक्ती दाखवण्याचं आणि गरज पडल्यास लष्कर व नागरी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करत, राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न अधिक बळकट करण्याचं आवाहन केले आहे.