नागपूर -जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) लँडमाइन निकामी करताना झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक नियमित गस्तीदरम्यान कांगा गली परिसरात पोहोचले असता त्यांना जमिनीत पुरलेला लँडमाइन आढळला. घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषेलगत अनेक ठिकाणी लँडमाइन्स पेरण्यात आलेल्या असतात. हे लँडमाइन निकामी करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला आणि त्यात दोन जवान जखमी झाले.
सीमावर्ती भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा लँडमाइन्सची जागा बदलते. त्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन लष्कराकडून वेळोवेळी अशा स्फोटकांचा शोध घेऊन ती निकामी करण्याची मोहीम राबवली जाते.
दरम्यान, पुंछमधील नलवा-देगवार तरवान परिसरातही कामगारांना गंजलेले संशयास्पद स्फोटक आढळून आले होते. याची माहिती मिळताच लष्कराच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सुरक्षितपणे ते स्फोटक नष्ट केले.
पुंछ हा पाकिस्तान सीमेवरील अतिसंवेदनशील भाग मानला जातो. या भागातून घुसखोरीचे प्रयत्न, शस्त्रांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांचे धोके लक्षात घेता भारतीय लष्कराकडून सतत कडक सुरक्षा व्यवस्था आणि गस्त ठेवण्यात येत आहे.





