Published On : Thu, Oct 26th, 2017

टीम इंडियाचे यूपीत भगवी शाल देऊन स्वागत, काहींवर लिहिले चक्क CM योगींचे नाव

Team India Arrives India
कानपूर: तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी टीम इंडिया आणि न्युझीलंडचे खेळाडू कानपूरला पोहोचले. यावेळी त्यांचे स्वागत वादात सापडले आहे. खेळाडूंचे स्वागत करताना त्यांना भगवी शाल देण्यात आली. तसेच या शॉलवर चक्क यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांचे नाव लिहिले होते. सर्वच खेळाडूंच्या स्वागतासाठी फुले सुद्धा देण्यात आली. यासोबतच त्या ठिकाणी 10 हजार दिवे सुद्धा लावण्यात आले होते. 29 ऑक्टोबर रोजी ग्रीनपार्क स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे.

हॉटेलात रामलीला, योगी सरकारला अनुसरून आयोजन
हॉटेल संचालक विकास कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, खेळाडूंना नायट्रोजन मॉकटेल दिला जाणार आहे. वॉटर साइटवर योगा आणि मेडिटेशनची व्यवस्था आहे. तसेच संध्याकाळी लहान मुले रामलीला सादर करतील. सर्वत्र दिवे आणि लॅम्प यांची रोषणाई करण्यात आली आहे. विकास यांनी बुधवारीच सांगितले होते की उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे, त्यामुळे आयोजन सुद्धा त्यानुसारच केले जाणार आहे.