Published On : Thu, Oct 26th, 2017

सावंतवाडी स्टेशनजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले

Advertisement

Duronto Express Derailed
मुंबई: सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले आहे. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्‍यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहे. मार्ग सुरळीत होण्यास किमान सहा तासांचा कालावधी लागेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. परिणामी कोकणकन्या, तुतारीसह बहुतांश एक्स्प्रेस गाड्या उशीराने धावत आहेत.

दुरांतो एक्स्प्रेस गोव्याहून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या (कुर्ला) दिशेने येत होती. सावंतवाडी आणि झाराप रेल्वे स्थानकादरम्यान एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे कर्मचारी रेल्वे पॅनल ट्रॅकवर ठेवून कलर काम करत होते. त्याचदरम्यान इंजिनची या पॅनलला धडक बसून ते रुळावरुन खाली घसरले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून लवकरात लवकर वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

या अपघातामुळे कोकण कन्या एक्सप्रेस, करमळी– एलटीटी (AC), सावंतवाडी- दादर तुतारी एक्सप्रेससह अनेक गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे.