नागपूर: संत्रा मार्केटकडून येणाऱ्या मोक्षधाम ते ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नागनदीवरील पुलाच्या बांधकामाची गती वाढवा आणि निर्धारीत वेळेच्या आता पुलाचे बांधकाम करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करा, असे निर्देश मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले.
मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आज सदर पुलाची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत डॉ. आर. झेड. सिद्दीकी, कंत्राटदार संजय मेडपीलवार होते. मोक्षधाम-ग्रेटनाग मार्गावरील नागनदीवर सुरू असलेल्या बांधकामाची गती आणि दर्जा संदर्भात आयुक्त मुदगल यांनी चर्चा केली. यावेळी आयुक्त यांनी पुलाच्या दोन्ही बाजूकडील सुरू असलेल्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले.
पुलाच्या बांधकामामुळे रस्ता बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्यात यावे, कामाचा दर्जाही उत्तम असावा, असेही ते म्हणाले. सदर काम सुरू असेपर्यंत मोक्षधाम ते कॉटन मार्केट मार्गाच्या सीमेंटीकरण कामालाही सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.