Published On : Thu, Sep 3rd, 2020

कोव्हिड बेडस्‌ची संख्या तात्काळ वाढवा

Advertisement

महापौर आणि आयुक्तांचे खासगी रुग्णालयांना आवाहन : डॉक्टरांसोबतच्या बैठकीत केली उपाययोजनांवर चर्चा

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचा दरही वाढत आहे. मृत्यूसंख्या कमी करायची असेल तर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी तात्काळ बेड्‌सची संख्या वाढवावी. आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

नागपुरात कोव्हिड संक्रमणाची भविष्यात उद्‌भवणारी परिस्थिती लक्षात घेता काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांवर पडणारा ताणही वाढला आहे. काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता भविष्यात जे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय करण्यासाठी पुढे येईल त्यांना परवानगी देण्यात येईल, असेही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. यासोबतच भविष्यात खासगी डॉक्टरांच्या सहभागाने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात गुरुवारी (ता. ३) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर संदीप जोशी यांच्या अध्‍यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने यांची उपस्थिती होती.

महापौर संदीप जोशी पुढे बोलताना म्हणाले, आयसीएमआरच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमालीची वाढणार आहे. त्यामुळे त्यादृष्टिने आताच तत्पर राहणे आवश्यक आहे. दररोज किमान पाच हजार लोकांची चाचणी व्हावी यासाठी चाचणी केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. नागपूर शहरात आता ५० चाचणी केंद्र आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर निर्णयही यासाठी घ्यायची गरज पडली, ते घेऊ. यात खासगी रुग्णालयांनी सोबत येऊन संघटितपणे लढा देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोव्हिडच्या दृष्टिकोनातून नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेकडे व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. रुग्णालये तयार आहेत, परंतु तेथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे. यासाठी जाहिरात काढली असून खासगी डॉक्टरांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी शहरात केवळ २० रुग्णालयांना कोव्हिड रुग्णालय म्हणून परवानगी देण्यात आली होती. आता ही संख्या वाढून ५१ झाली आहे. शहरात वाढणारी मृत्यूसंख्या कमी करणे, हे आपले सध्या उद्दिष्ट आहे. जे खासगी हॉस्पीटल कोव्हिड हॉस्पीटल म्हणून सेवा देण्यासाठी पुढे येतील त्यांना तातडीने परवानगी देण्यात येईल. आता जी बेड्‌सची संख्या आहे, त्यापेक्षा दुपटीने किंवा तिपटीने बेड्‌स वाढावे, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. आयएमएने यासाठी पुढाकार घेऊन सेवा देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांची यादी पाठविल्यास २४ तासात कार्यादेश काढू, असेही ते म्हणाले. विमा असतानाही रुग्णांना रक्कम भरण्यासाठी बाध्य केले जाते. असे यापुढे न करता, कॅशलेस विमा असेल तर त्याचा लाभ रुग्णांना मिळू द्या, असे आयुक्तांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी यावेळी शहरातील बेडसंख्या, आयसीयू आणि ऑक्सीजन बेडसंख्या आदींबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या शहरात सुरू असलेल्या कोव्हिड रुग्णालयांमध्ये केवळ ४४० आयसीयू बेड्‌स उपलब्ध असून ते अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांचा विमा असतानाही रुग्णालये त्याचा लाभ देत नाही किंवा विमा असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात, हा मुद्दा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी उपस्थित केला.

बैठकीला उपस्थित डॉक्टरांनीही यावेळी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि सूचनाही मांडल्या. प्रत्येक मोहल्ल्यात कोव्हिड क्लिनिक तयार केले तर नागरिकांना त्यांच्या घराजवळच यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. तेथूनच त्यांना होम आयसोलेशन करायचे की रुग्णालयात भरती व्हायचे, याबाबत माहिती मिळेल. काही खासगी रुग्णालयात बेड्‌स उपलब्ध आहेत, मात्र कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. मनपाने कर्मचारी पुरविले तर खासगी रुग्णालये सेवा देतील. गरोदर मातांची आरटी-पीसीआर चाचणी होणे अत्यावश्यक आहे. मनपाने कोव्हिडबाधीत गरोदर मातांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करावी, बाजारात मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्तींवर सक्तीने दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना उपस्थित डॉक्टरांनी मांडल्या. या सर्व सूचनांचे स्वागत करीत महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी खासगी रुग्णालयांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोरोनाच्या भविष्यात येणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन संघटित लढा देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, आय.एम.ए. व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.