मनपा क्षेत्रातील मोबाईल टॉवर धोरणाला स्थापत्य समितीची मंजुरी
.
.
नागपूर : मोबाईल टॉवर धोरणाची अंमलबजावणी तसेच रोड कटींगच्या परवानगीमुळे नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गुरूवारी (ता. ६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला समितीचे सभापती संजय बंगाले, उपसभापती रामकृष्ण वानखेडे, सदस्या सरिता कावरे, पल्लवी श्यामकुळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमने, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक आदी उपस्थित होते.
नागपूर शहरामध्ये अनेक वर्षांपासून ८०० अनधिकृत मोबाईल टॉवर आहेत. उच्च न्यायालयामध्ये हा विषय प्रलंबित असल्याने टॉवरच्या माध्यमातून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नव्हते. मात्र नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने रेडिरेकनरच्या दरात शास्ती लावून एक वर्षासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. या एक वर्षामध्ये अनधिकृत टॉवर धारकांनी मनपाच्या नियमाप्रमाणे बांधकाम व परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा परवानगी रद्द करण्यात यावी, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. या टॉवरच्या माध्यमातून मनपाला अंदाजे १० कोटींच्यावर उत्पन्न होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुनर्भरण करताना त्या कामाची व्हिडीओ क्लिप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात कोणताही घोळ होणार नाही. याशिवाय कामाचा दर्जा टिकून राहण्यासाठी सॅम्पलची वेळोवेळी तपासणी करणेही आवश्यक आहे. खासगी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या रस्ते खड्ड्यांच्या कामाची तपासणी करण्यात यावी. यामध्ये योग्य काम न आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सभापती संजय बंगाले यांनी दिला. याशिवाय रोड कटींग संदर्भातील परवानग्या तातडीने देण्यात आल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीमध्ये शहरातील विविध ठिकाणच्या खड्ड्यांचे हॉट मिक्स व जेट पॅचरच्या माध्यमातून पुनर्भरण करण्यात आले. यामध्ये हॉट मिक्सच्या माध्यमातून ८२६० खड्डे तर जे पॅचर मशिनद्वारे २३५२ खड्डे असे एकूण १० हजार ६१२ खड्डे बुजविण्यात आले आहेत.
जाहिरात विभागही मनपाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी नवा प्रस्ताव असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या नवीन प्रस्तावासाठी विभागाने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्ता पक्ष नेते व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती देण्यात यावी. प्रस्तावाबाबत महापौर व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याचेही सभापती संजय बंगाले यांनी निर्देशित केले. मनपाच्या मालमत्तेवर जाहिराती चिकटवून शहर विद्रुपीकरण करण्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. स्वत:च्या जाहिरातीसाठी शहराचे सौंदर्य बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.