
मुंबई – महाराष्ट्रात होणाऱ्या २०२५–२६ मधील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभाग, मुंबईने २४ तास कार्यरत असलेला विशेष नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन केला आहे. निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आयकर विभागाच्या निवडणूक देखरेख यंत्रणेचा भाग म्हणून हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून आचारसंहिता (MCC) लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत तो कार्यरत राहणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अघोषित रोख रक्कम, मौल्यवान वस्तू अथवा मतदारांना प्रलोभने देण्याच्या घटना रोखणे हा या कक्षाचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यातील सजग नागरिकांना अशा गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी आयकर विभागाने थेट संपर्काची सोय उपलब्ध करून दिली आहे. नागरिक व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोनद्वारे ७७३८११३७५८ या क्रमांकावर, तसेच mumbai.addldit.inv8@incometax.gov.in या ई-मेल आयडीवर माहिती देऊ शकतात.
हा नियंत्रण कक्ष रूम क्रमांक ३१६, तिसरा मजला, स्किंडिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१ येथे कार्यरत आहे.
विश्वासार्ह माहिती प्राप्त होताच तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार आयकर विभाग, मुंबईने केला आहे.निवडणूक प्रक्रियेची शुचिता राखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही आयकर विभागाने केले आहे.








