Published On : Thu, Nov 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; दारूची बाटली फोडली, नव्या विद्यार्थ्यांना काचा उचलायला लावल्या!

Advertisement

Two First-Year Dental Students Allege Ragging by Interns at Nagpur Government Dental College

नागपूर : शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या नवख्या विद्यार्थ्यांचे स्वागत ज्ञानाने नव्हे, तर कथित छळ आणि अपमानाने झाल्याचा संतापजनक प्रकार नागपुरात समोर आला आहे. शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी दोन कनिष्ठ विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. शिवीगाळ, जातिवाचक टिप्पणी आणि अपमानास्पद वागणुकीनंतर चक्क दारूची बाटली फोडून तिच्या काचा उचलण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रवेश घेऊन अवघे १५ दिवस झाले असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरच्या सुमारास दोन कनिष्ठ विद्यार्थ्यांना वरिष्ठांनी एका ठिकाणी बोलावले. तेथे त्यांना शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता जातिवाचक टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर मद्याची रिकामी बाटली फोडून तिचे काचेचे तुकडे उचलण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. स्वतंत्र वसतिगृह व्यवस्था असतानाही कनिष्ठ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याने महाविद्यालयातील वातावरणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासनाची धावपळ; रॅगिंगविरोधी समितीकडून चौकशी-

घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने रॅगिंगविरोधी समितीची बैठक घेतली. संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, तक्रारदार विद्यार्थ्यांच्या पालकांनाही ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. अजनी पोलिसांनाही या घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. मात्र, आरोपांची सत्यता आणि घटनेचे नेमके स्वरूप चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

दिवाळीच्या सुट्यांमुळे तपासात अडथळे-

घटनेनंतर दिवाळीच्या सुट्यांमुळे वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी घरी गेल्याने संबंधितांचे जबाब नोंदविण्यात अडचणी येत आहेत. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक हेही रजेवर असल्याने पुढील निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर होणार असून, त्यानंतर समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

रॅगिंगविरोधात कठोर नियम असतानाही विद्यार्थ्यांना अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असेल, तर हे केवळ दोन विद्यार्थ्यांच्या छळाचे प्रकरण नाही, तर महाविद्यालयातील सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह आहे. दोषींवरील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.