मुंबई: राज्याच्या स्वप्नवत समजल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा इगतपुरी ते अमणे पुन्हा एकदा अपूर्ण राहिला आहे. ७६ किमी लांबीचा हा महत्त्वाचा टप्पा ७०१ किमी लांब महामार्गाचा शेवटचा भाग असून, त्याचे उद्घाटन १ मे रोजी होणार असल्याचे संकेत होते. मात्र, प्रतिक्षेचा शेवट यावेळी झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होईल, अशी चर्चा होती. मात्र, ती केवळ चर्चाच राहिली.
महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला करण्यात आला होता. तेव्हापासून नागरिकांनी उर्वरित मार्गाच्या उद्घाटनासाठी वाट पाहिली. इगतपुरीपासून पुढे अमणेपर्यंतचा मार्ग हा दुर्गम पर्वतीय भागातून जातो. त्यामुळे बांधकामात वेळ लागत असल्याचे MSRDC कडून सांगण्यात आले होते.
परंतु, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. “प्रकल्प मोठा आहे हे मान्य आहे, पण सततच्या तारीखपछाडीमुळे वैतागलो आहोत, असे मत नाशिकच्या एका वाहनचालकाने व्यक्त केले. सध्या नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना अजूनही जुना मुंबई-नाशिक मार्ग वापरावा लागत आहे, ज्यामुळे वेळ व इंधनाचा खर्च वाढतो आहे.
राज्य सरकार आणि MSRDC कडून या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. पण ‘मुहूर्त’ केव्हा ठरणार, याचीच आता उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्घाटनाची नवी तारीख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही.
दरम्यान, हा महामार्ग पूर्णत्वास गेल्यावर तो नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे ८ तासांमध्ये पूर्ण करणारा एक अभूतपूर्व अनुभव ठरणार आहे. त्यामुळे आता फक्त त्या अंतिम हिरव्या झेंड्याची प्रतीक्षा आहे.