नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सेवा नि:शुल्क असून, इतरांना अत्यंत माफक दारात सेवा उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी यासेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता: १०) मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनपात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला पुरी, झोनल अधिकारी डॉ. बकुल पांडे, डॉ. सुषमा खंडागळे, डॉ. मयुरी सोनटक्के, डॉ. मोहम्मद अतहर, डॉ. गाडावे, डॉ. अदिती कच्छवे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मागर्दर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरिता कर्मचाऱ्यानी आपले कर्तव्य योग्यरीत्या करवे, मनपाच्या या फिजिओथेरपीची केंद्रांचा फायदा दिव्यांग, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व बालक यांना होणार आहे. तरी आशा अंगणवाडी सेविकांमार्फत नागरिकांना या केंद्राची माहिती मिळावी आणि नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
यावेळी इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला पुरी यांनी सांगितले की, या पूर्वी रुग्णालयात खाजगी तत्त्वावर फिजिओथेरपी केंद्र सुरू होते. पण काही कारणाने हे केंद्र बंद करण्यात आले. आता 6 वर्षांनी पुन्हा हे केंद्र कार्यान्वित होत असून, नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी रुग्णालयाच्या विविध सेवांचा आढावा घेत रूग्णालयाची पाहणी केली.
फिजिओथेरपी ही एक विज्ञान-आधारित आरोग्य सेवा आहे जी लोकांना सामान्यपणे हलण्यास आणि कार्य करण्यास मदत करते. यात अनेक प्रकारच्या उपचारांचा समावेश असू शकतो. दिव्यांग व्यक्तीप्रमाणे वृध्द व्यक्ती,गरोदर स्त्रिया.गंभीर आजार असलेले रुग्ण यांना देखील शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी फिजिओथेरपी सेवेची आवश्यकता भासते. याची जाणीव ठेवत मनपाद्वारे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह ,सदर रोग निदान केंद्र आणि महाल रोग निदान केंद्र येथे फिजिओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
फिजिओथेरपी केंद्रावर मॅन्युअल थेरपी:- वेदना, जडपणा आणि सूज मध्ये मदत करण्यासाठी सांधे मोबिलायझेशन, मसाज आणि स्ट्रेचिंगचा समावेश आहे. व्यायाम :- मूळ समस्यांवर उपचार करण्यास मदत करते. ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व्ह स्टिम्युलेशन (टीईएनएस) थेरपी: फिजिओथेरपीमध्ये वापरली जाणारी उपचार पद्धती, याव्यतिरिक्त चुंबकीय थेरपी, ड्राय सुईलिंग आणि ऍक्युपंक्चर, टेपिंग, हायड्रोथेरपी, डायथर्मी, अल्ट्रासाऊंड आणि फोनोफोरेसीस सुविधा उपलब्ध असणार आहे. हे विशेष.