Published On : Mon, Sep 18th, 2023

मनपाच्या निर्माल्य रथाचे लोकार्पण

१० झोनसाठी १४ रथ देणार सेवा : निर्माल्यापासून होणार खत निर्मिती

नागपूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी (ता.१८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या निर्माल्य रथांचे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील लहाने, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, लोकेश बासनवार, एजन्सीचे समीर टोणपे, रमाकांत ढोंबे आदी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलशामध्ये संकलीत केले जाते. दरवर्षी १० झोनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे १० निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात येत होती. या रथांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी चार अतिरिक्त रथ वाढविण्यात आले असून यंदा १० झोनमध्ये १४ निर्माल्य रथांची सेवा मिळणार आहे.

Advertisement

या निर्माल्य रथाव्दारे झोन निहाय सार्वजनिक गणेश मंडळाव्दारे स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाचे निर्माल्य श्रध्दापुर्वक संकलीत केले जाईल व शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. घरगुती श्री गणेशाचे निर्माल्य नागरिकांनी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक गणेश मंडळांकडे सुपूर्द करावे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी ते निर्माल्य रथामध्ये संकलीत करतील. यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये निर्माल्य संकलन कलशाची व्यवस्था करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

निर्माल्य रथांसाठी टोल फ्री क्रमांक

नागपूर महानगरपालिकेद्वारे दहा झोनमध्ये १४ निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्माल्य रथांची व्यवस्था एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या एजन्सींद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही एजन्सीद्वारे या रथांच्या व्यवस्थेसाठी टोल फ्री क्रमांक देखील जारी केले आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोनमध्ये एजी एन्व्हायरो एजन्सीद्वारे निर्माल्य रथांची व्यवस्था असून यासाठी 18002677966 हे टोल फ्री क्रमांक तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या झोनसाठी बीव्हीजी एजन्सीद्वारे 18002662101 हे टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement