
नागपूर : शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये रिकाम्या भूखंडावर सांडपाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सांडपाण्यामुळे भूखंडाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सांडपाणी साचत असल्याने दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत नगरसेवकांना विचारणा केली असता, ‘आम्ही इंजिनिअर नाही,’ असे उत्तर मिळाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मात्र, नागरिकांच्या मूलभूत समस्यांची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



