मुंबई : अंडरवर्ल्ड गँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणातील ११ आरोपींना मुंबईतील मकोका कोर्टाने आज शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ११ आरोपींपैकी ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तनाशा हा अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनच्या जवळचा होता.
२ जून २०१० रोजी फरीद तनाशा याची त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी त्याची पत्नी आणि मुलगी देखील घरात उपस्थित होते. ही हत्या करण्यात आली होती. त्यादिवशी फरीदची तब्येत ठिक नसल्यानं दुपारच्यावेळी तो घरीच होता. अचानक दोन शूटर्सनी घरात घुसून बेडरूममध्ये झोपलेल्या फरीदवर बेछूट गोळीबार केला आणि ते पळून गेले. या हल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता.
तमाशाची हत्या चेंबूरमधील एका रिअल इस्टेटच्या वादातून झाली होती. चेंबूरला दत्तात्रय भाकरे हा बिल्डर एका जागी इमारत बांधणार होता त्याला तिथल्या सोसायटीतील रहिवासीयांनी विरोध केला होता. तनाशानं सोसायटीवासियांची बाजू घेतली होती. त्यामुळे भाकरे यानं तनाशचा काटा काढायचा ठरवलं. त्यानं भरत नेपाळी आणि विजय शेट्टी यांना सुपारी दिली.
जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये जफर खान, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांचा समावेश आहे. तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी यांना कोर्टानं १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.