Published On : Mon, Dec 20th, 2021

कडाक्‍याच्‍या थंडीत नागपूरकरांनी घेतला गायन, वादन व नृत्‍याचा आस्‍वाद

Advertisement

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा चौथा दिवस गाजला

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या चौथ्‍या दिवशी संगीताचार्य पं. द. वी. काणेबुवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने भारतरत्‍न पं. भीमसेन जोशी जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवाचे औचित्‍य साधून ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ या शास्‍त्रीय गीत-संगीताच्‍या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील व त्‍यांच्‍या चमूने सुगम शास्‍त्रीय संगीत व नंतर पं. विजय घाटे यांचा मेलोडिक रिदम सादर करून रस‍िकांची मने जिंकली. कडाक्‍याची थंडीतही मोठ्या संख्‍येने उपस्थित नागपूरकरांनी या कार्यक्रमाचा आस्‍वाद घेतला.

या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्‍यासह महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार अजय संचेती, वनराईचे गिरीश गांधी, उद्योजक सत्‍यनारायण नुवाल, दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, बी. सी. भारतीया, सुरेश राठी, अश्विन मेहाडिया, कैलाश जोगानी, श्‍याम देशपांडे, स्‍नेहल पाळधीकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते कलाकरांचा सत्‍कार करण्‍यात आला.

सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तबल्‍यावर पद्मश्री पं. विजय घाटे, तालवाद्यावर गजानन रानडे यांनी साथसंगत केली. मंजुषा पाटील यांनी झपताल मध्‍य लयीमध्‍ये राग सोहनीमधील बंदिश ज‍ियरा रे… ने कार्यक्रमाची सुरुवात केली. द्रुत लयीत तराना सादर करून त्‍यांनी रसिकांची मने जिंकली. शोभा गुर्टू यांची होरी रंगी सारी गुलाबी चुनरियां रे सादर करून सा-यांना गुलाबी रंगात रंगवले. त्‍यानंतर त्‍यांनी अवघे गरजे पंढरपूर, अबीर गुलाला इत्‍यादी अभंगांची मेडले सादर केली. कांचन गडकरी यांच्या फर्माईश वर त्यांनी जोहार मायबाप ही संत चोखामेळा यांची रचना सादर करून आपल्या कार्यक्रमाची सांगता केली.

त्‍यानंतर पं. विजय घाटे यांची संकल्‍पना असलेल्‍या मेलोडिक रिदम कार्यक्रम सादर झाला. यात सुरंजन खंडाळकर यांनी गायन, शीतल कोलवलकर यांनी कथ्थक सादर केले. ड्रम्‍सवर जिनो बॅंक्स, घटमवर गिरीधर उडुपा, तबल्‍यावर स्‍वत: पं. विजय घाटे, संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी होते. रसिकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले. गिरिधर उडूपा यांचे घटम, जिनो बँक यांचे ड्रम्‍स, मिलिंद कुळकर्णी यांची संवादिनी आणि पं विजय घाटे यांची जुगलबंदी हा या कार्यक्रमाचा शिखर ब‍िंदू ठरला.

खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.