Published On : Wed, Sep 25th, 2019

निवडणुक काळात काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूरद्वारे कार्यवाही होणार

Advertisement

नागपूर : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूर यांच्या कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 3785 यावर काळ्या पैश्याच्या संबंधित तक्रारी अथवा माहिती दाखल करता येतील.

याच प्रमाणे व्हाट्स अॅप क्रमांक 9403391664 आणि फॅक्स क्रमांक 0712-2525844 यावर सुद्धा तक्रार नोंदवता येईल, अशी माहिती आयकर अन्वेषण विभाग नागपूरचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अन्वेषण विभाग नागपूरचे उप संचालक अभय नन्नावरे उपस्थित होते.

विदर्भातील अकराही जिल्ह्यात काळ्या पैश्यांच्या बाबतील कार्यवाहीसाठी अकरा जलद कृती दलांची (क्यू.आर.टी.) स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक कृती दलात एक सहायक किंवा उप-संचालक दर्जाचे अधिकारी, तीन आयकर अधिकारी, दोन आयकर निरीक्षक यांचा समावेश असेल. सुमारे 70 ते 75 अधिकारी संपूर्ण विदर्भात या कार्यवाहीसाठी तैनात राहतील. याचप्रमाणे नागपूर विमानतळावर ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात आले असून यातही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळासोबत समन्वय साधून आयकर विभाग कार्यवाही करणार आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बळ आणि स्टॅटीक्स सर्वेलन्स टीम्सच्या माध्यमातून पोलीस दलाशी समन्वय साधला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी तसेच, निवडणुकीदरम्यान काळ्या पैश्याच्या वापर टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन काळा पैसा, रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर मुल्यवान वस्तुंची साठवण तसेच त्याचे वितरण यांची माहिती संबंधित टोल फ्री क्रमांक, व्हाट्स-अॅप वर पुराव्यासह पाठवावी, असे आवाहन आयकर अन्वेषण विभाग नागपूरचे प्रधान संचालक जयराज काजला यांनी यावेळी केले.