
नागपूर पोलीस आयुक्तांच्या ‘ऑपरेशन मुक्ती’ उपक्रमांतर्गत बेलतरोडी पोलिसांनी मानवतेचे उदाहरण घालत एका निराधार महिलेला सुरक्षित आश्रय मिळवून दिला. अनेक दिवसांपासून गजानन मंदिराजवळ बेवारस अवस्थेत पडून असलेल्या महिलेबाबत आज सकाळी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ASI अनिल बाबळे, महिला पोलीस शिपाई प्रियंका रामटेके, पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यांचे पथक त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. तेथे एक 57 वर्षीय महिला अत्यंत अशक्त आणि असहाय अवस्थेत आढळली. विचारपूस केल्यानंतर तिने आपले नाव उज्वला विजय पाटील असे सांगितले; मात्र राहण्याची जागा किंवा कोणतेही नातेवाईक नसल्याने ती पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट झाले.
मानवतावादी दृष्टिकोनातून पोलिसांनी त्वरित तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि पुढील काळजीसाठी तिला निराधार निवारा केंद्रात सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले.
या तत्पर कारवाईमुळे एक बेवारस महिला सुरक्षिततेपर्यंत पोहोचली असून ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.









