
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला रविवारी (७ डिसेंबर) नागपूरकरांनी उत्साहात प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली. नागरिकांनी विविध सामाजिक, पायाभूत, शैक्षणिक, रोजगार तसेच शासकीय योजनांशी संबंधित समस्यांसाठी थेट मंत्र्यांसमोर मांडणी करत मार्गदर्शन मिळवले.
कार्यक्रमात अनेक तरुणांनी स्टार्टअप प्रकल्प, तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पना, ट्रॅफिक सोल्यूशन्स, रस्ते सुरक्षा उपक्रम आणि समाजहिताचे मॉडेल्स सादर केले. वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्ती, नवीन मार्गांची गरज व स्मार्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टीमविषयी तरुणांनी मते मांडली. गडकरी यांनी सर्व प्रस्ताव ऐकून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश दिले.
दिव्यांग बांधवांची उपस्थितीही विशेषत्वाने जाणवली. कृत्रिम अवयव, मोबिलिटी साधने, ई-रिक्षा, मोटराइज्ड तीनचाकी आदी सुविधांसाठी त्यांनी निवेदने दिली. काही दिव्यांग नागरिकांनी गडकरी यांच्यामार्फत मिळालेल्या उपकरणे व सहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अनुकंपा तत्त्वावरील नोकरी, श्रावणबाळ निवृत्तीवेतन, सामाजिक सुरक्षा योजना, महावितरण समस्यांपासून भूमिअभिलेख, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण आदी विविध विषयांवरील तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या. वृद्ध, महिला आणि वंचित घटकांच्या अडचणींवरही गडकरी यांनी सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
यावेळी नागपूर महानगरपालिका, एनआयटी, जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, आरोग्य यंत्रणा, पीडब्ल्यूडी, पोलीस, रोजगार कौशल्य विभाग, भूमापन, सेतू कार्यालय, CRC सेंटर आदी अनेक विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूरमध्ये मंत्री गडकरींच्या जनसंपर्क उपक्रमामुळे नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासकीय प्रतिसाद यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाल्याचे यावेळी दिसून आले.









