नागपूर – उपराजधानी नागपूरात गुरुवारी अवघ्या दोन तासांच्या जोरदार पावसाने महापालिकेच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दुपारी १ वाजेपर्यंत कायम राहिला. या कालावधीत संपूर्ण शहराच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले दिसून आले. रेल्वे स्थानक परिसर, लोखंड पुल, कव्हरपेठ यांसारख्या भागांतील रस्ते जलमय झाले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला.
शहरातील उत्तरी, मध्य आणि पूर्व नागपूर भागात सर्वाधिक पाऊस झाला. सदर, मनकापूर, जयस्तंभ चौक, मानस चौक, कव्हरपेठ यांसारख्या भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं अडकली. काही नागरिकांना स्वतःची वाहने पाण्यातून ढकलत नेण्यासाठीही संघर्ष करावा लागला.
रेल्वे स्थानक परिसरात जलतरण तलावासारखी परिस्थिती-
रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मानस चौक ते जयस्तंभ जोडणारा मार्ग अक्षरशः तलावात रूपांतरित झाला. या भागात मोठा वाहतूक कोंडीत निर्माण झाला. पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्याचा एक भाग पूर्णतः पाण्यात बुडाल्यामुळे वाहने केवळ एका बाजूनेच चालवावी लागत होती.
अंडरपासमध्ये साचले पाणी, वाहतूक ठप्प-
लोखंड पुल, मेहदीबाग, नरेंद्र नगरसारख्या निचांकी भागातील अंडरपासमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले. काही अंडरपास तर पूर्णपणे पाण्यात बुडाले. यामुळे नागपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अंडरपास वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
खैरीपुरा येथील मेहदीबाग अंडरपासमध्ये तर पाणी साचल्याने परिसरातील मुलांनी त्याचा स्विमिंग पूलसारखा उपयोग करत जलतरणाचा आनंद घेतल्याचेही दृश्य दिसले.
महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह-
सात जुलै ते नऊ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि महापालिकेच्या ड्रेनेज व पाणी निचरा व्यवस्थेचे अपयश उघड केले. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.