नागपूर : जवळपास ८ जणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हनचे पितळ उघडे पडले आहे. संबंधित महिलेने ‘हनी ट्रॅप’ करत छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत एका ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी जबरदस्तीने लग्न करत १७ लाख उकळल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, गुलाम नावाच्या व्यापाऱ्याला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर समीरा नावाच्या महिलेचा त्यांना सप्टेंबर २०२२ मध्ये फोन आला होता. तिने स्वत: घटस्फोटित असल्याचा दावा करत त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिने त्यांना भेटायला बोलावले व मानसरला नेले. तेथे दोघे एका हॉटेलमध्ये गेले व शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान समीराने आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. यानंतर तिने गुलामशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. गुलाम हा विवाहित असल्याने त्याने लग्नास नकार दिला.
मात्र छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर गुलामने तिच्याशी लग्न केले. . यानंतर समीरा आणि तिच्या कुटुंबीयांनी गुलामला धमकावून मालमत्ता आणि खर्चासाठी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. गुलामने तिला पाच लाख रुपये दिले.अशाच प्रकरणे वारंवार पैशांची मागणी केल्यानतंर समीराने त्याच्याकडून १७ लाख उकळले.
इतकेच नाही तर अर्धी संपत्ती समीराच्या नावावर करण्यासाठी तिच्या नातेवाईकांकडून गुलामवर दबाव टाकण्यात येत होता. या प्रकाराला त्रासून गुलाम यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी समीरा, तिची आई रेहाना, काका मौसीन, मौसीनची पत्नी, ड्रायव्हर हरीश, मित्र वसीम, डॉ. वसीम शेख आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, धमकावणे आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.