
नागपूर : पारडी परिसरात सोशल मीडियावरील ओळख एका तरुण शिक्षिकेसाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले; मात्र लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय पीडितेची इंस्टाग्रामवर तिलक निर्मल रेवार याच्याशी ओळख झाली होती. ओळख वाढत जाऊन दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. याचाच फायदा घेत आरोपीने तिला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून आपल्या घरी नेले आणि लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने वारंवार लग्नाचे आश्वासन देत तिला विविध ठिकाणी, तसेच ओयो हॉटेलमध्ये नेऊन अनेक वेळा अत्याचार केला. काही काळानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला आणि अखेरीस लग्नास नकार दिला. यावेळी पीडितेला फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तिने धाडसाने पोलिसांत धाव घेतली. आरोपीकडून धमक्याही दिल्याचे तिने सांगितले आहे.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तिलक निर्मल रेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.









